आई समजून घेताना…

मला आई नावाच्या या अद्भुत रसायनाविषयी नेहमीच भारी आकर्षण. कायमच हृदयात खूप अप्रूप आणि अपार प्रेम. नास्तिक असल्याने परमेश्वर, त्याच्या लीला वगैरे काही मानत नाही, पण आईच्या लीला या अद्भुतच. कधी समजणाऱ्या तर कधी समजून न उमगलेल्या. आजही एखाद्या मुलीने love you म्हटल्यापेक्षा, आईच्या तोंडून निघणारा “बाळ” हा शब्द ऐकायला कान आसुसलेले असतात. अर्थात “आई” या दोन शब्दात तेवढा गूढ अर्थ सामावलेला आहे. आई शिवाय दिवस, विचारच नाही करवत. एखादवेळ कामानिमित्त बाहेर जरी असलो तरी आई हृदयात असतेच, तिची आठवण येतेच. “आई” खूप समजून घ्यायची आहे, खूप लिहून काढायची आहे. पण आई संपूर्णतः समजून घेणं अशक्यच…! कारण ना माझ्यातला संशोधक तेवढा मोठा आहे ना माझ्यातला लेखक. परवा एक असा प्रसंग बघण्यात आला, ज्यामुळे मी पुन्हा नव्याने “आई” समजावून घ्यायला लागलो…

परवा दुपारी भर उन्हाची दोन-अडीचची वेळ. ठिकाण कोल्हापूरमधील गंगावेश… 45 च्या आसपास वय असेल अश्या एका गृहस्थाला, साधारणतः 65 च्या वरती वय असणारी एक वयस्क आजी st stand च्या दिशेने घेऊन चालली होती. हो, बरोबर वाचलत तुम्ही..! आजी त्या गृहस्थाला घेऊन चालली होती. मी बाईकवरती होतो आणि काहीसे traffic असल्यामुळे बाईक अगदी चालवत न्यावी अश्या गतीने पुढे सरकत होती, त्यामुळे इकडे-तिकडे पाहता माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. एका दवाखान्यातुन हे दोघे बाहेर पडले होते. तो गृहस्थ खूप अशक्त होता. मळलेली पॅन्ट, शर्टची काही बटणं निघालेली, पांढरी पडत चाललेली दाढी, केसही विस्कटलेलेच…! असं काहीसं त्याचं वर्णन करता येईल. त्याचा डावा हात आजीच्या खांद्यावर होता आणि आजीने आपल्या डाव्या हाताने तो पकडलेला. तर आजीचा उजवा हात त्याच्या कमरेभोवती घट्ट होता. तीच्या अंगावर भार देत तो कसातरी पाऊलं पुढं टाकत होता. आजीही शिडशिडीत, निळसर लुगडं, पांढरं कपाळ, ती सुरकुत्या पडलेली त्वचा तर जणू तिला तिचं म्हातारपण ओरडून सांगत होती. आता ते दोघे माझ्यापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर होते. त्याच्या तोंडून फक्त आई एवढाच शब्द निघत होता आणि ती आजी त्याला धीर देत होती, ती वयस्क आजी त्याची आईच असणार या माझ्या तर्कावर आता शिक्कामोर्तब झाला होता. ती दोघ खेडवळ माय-लेकरं होती, हलाखीच्या परिस्थितीत जगणारी होती.

त्याला नेमकं काय झालेलं ठाऊक नाही, पण कसल्यातरी असह्य वेदना होत असाव्यात. चेहरेपट्टीत बदल, काहीसं विव्हळण, आई शब्दाचा वारंवार उच्चार यातून मी काढलेला हा निष्कर्ष. कारण सुखाच्या क्षणी बऱ्याच जणांना नसेल आठवेत आई पण वेदना होत असतील तर तिची आठवण काढावी लागत नाही, आपसूकच आपल्या तोंडून, “आई गं ssss” असा शब्द येत असतो. तर ती माय-लेकरं अशीच पुढं जात होती. वेदनेमुळे लेकाच्या डोळ्यात पाणी होतं, तर आपल्या लेकराच्या वेदना आपण कमी करू शकत नाही याच्या वेदना त्या आईला होतं होत्या. ती st stand कडे जाणारी रस्ता कदाचित दोघांनाही धूसर दिसत होती. कारण त्या माय-लेकरांच्या डोळ्यात ओला दुष्काळ होता, अश्रूंनी कल्लोळ माजवला होता. ट्राफिक अजूनही होतंच, त्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत-काढत ते दोघे पुढे सरकत होते आणि काही वेळात त्या जीवघेण्या गर्दीत विलीन झाले, दिसेनासे झाले.

मी मात्र आता ट्राफिक मध्ये, त्या गर्दीमध्ये कुठेच नव्हतो. त्या गर्दीत माझ्या शरीराला एकटं सोडून माझं मन त्या माय-लेकरांच्या मागं धावत होतं. अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. निसर्गाचा एक सर्वसामान्य नियम आहे, लहानपणी आई-वडील आपल्याला सांभाळत असतात आणि त्यांच्या वृद्धापकाळात आपण त्यांची काठी व्हायचं असतं. पण हा नियम मला त्या आजीच्या बाबतीत कुठे लागू होताना दिसतंच नव्हता. काय चूक असेल त्या मायची, तिला कधी म्हातारपणी काठीच मिळणार नाही का..? घरची गरिबी, हा मुलगा असला आणि त्यात पांढरं कपाळ…! कोणते विचार आता तिच्या मनात घोंघावत असतील…? सुखाची स्वप्नं तिला पडतच नसतील का…? आता ती जगतेय त्याला जगनं म्हणायचं कि, रोजच मरणं…? बस, असे कित्येक प्रश्न माझ्यासमोर उत्तरं मागत होते. मग कॉलेजच्या परीक्षांमध्ये माझा पेपर कव्हर झाला म्हणून दिमाखात सांगणारा मी आता पुर्णतः अनुत्तरीत झालो होतो. मला कळून चुकलं कि या आजीच्या जीवनाच्या परिक्षेचा हा पेपर कव्हर होईल तो ती मेल्यावरंच….!

नंतर वाटलं अरे, आई समजून घ्यायची म्हणजे काही खायची गोष्ट नाही… म्हणून मग माझ्याच कवितेतील काही ओळींमध्ये मी आईलाच सरळ प्रश्न केला…,
“ना कधी गुलाब दिला तुला
ना कधी i love you म्हटलं
तरी आजही तू माझ्यावर
निस्सीम निस्वार्थी प्रेम करतेस…
ए सांग ना आई तुला हे सारं कसं जमतं…?”
– विष्णू वजार्डे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *